Kalambaste Leopard Attack: कळंबस्तेत सलग दोन दिवस बिबट्याचा धुमाकूळ: पाळीव गाईंवर हल्ला, एका गाईचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

हाक्रवणे आणि मोहल्ला परिसरात दहशतीचे वातावरण; वनविभागाने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

देवरुख:

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, सलग दोन दिवस मानवी वस्तीमध्ये पाळीव गाईंवर हल्ले झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यांमध्ये एका गाईचा मृत्यू झाला असून दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे. लोकवस्तीत बिबट्याने शिरकाव केल्याने कलंबस्ते आणि परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री कळंबस्ते हाक्रवणे येथील शांताराम सनगरे यांच्या घराशेजारी बांधलेल्या गाईवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सनगरे यांची गाय गंभीर जखमी झाली. घराच्या अगदी जवळ बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

पुलाजवळील मोहल्ला परिसरात दुसरा हल्ला

ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे कळंबस्ते पुलाजवळील मोहल्ला परिसरात बिबट्याने पुन्हा एका पाळीव गाईवर हल्ला केला. येथील रहिवासी अहमदअली दसुरकर यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला चढवला, ज्यामध्ये त्या गाईचा मृत्यू झाला. रात्री आणि पहाटेच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक, महिला, लहान मुले आणि शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

पिंजरा आणि कॅमेरे लावण्याची मागणी

वनविभागाने या घटनांची तातडीने दखल घेऊन कलंबस्ते परिसरात बिबट्याचा शोध घ्यावा, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत, अशी आक्रमक मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तात्काळ मोहीम राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 11-09-2026