Chiplun Highway Service Road Widening: चिपळूणात महामार्गावरील सर्व्हिस रोडचे रुंदीकरण; गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या प्रवासासाठी प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

उड्डाणपुलाखालील रस्त्यांची रुंदी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ६ विशेष पथके तैनात

चिपळूण:

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाने चिपळूण शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील उड्डाण पुलावरील सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात यश न आल्याने, अखेर शहरातील सर्व्हिस रोडवरूनच गणेशभक्त गावाला येणार आहेत. त्या दृष्टीने हे सर्व्हिस रोड रुंद करण्याची आणि रस्ता सुस्थितीत आणण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

शहरातील बहादूरशेख चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. उड्डाण पुलावरील स्लॅब पूर्ण झाला असून आता त्यावर डांबरीकरणाचे कोटिंग पाऊस संपल्यानंतर केले जाणार आहे. गणेशोत्सवात या उड्डाण पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. मात्र, अतिथी हॉटेल ते प्रांत कार्यालयादरम्यान भरावाचे मोठे काम शिल्लक असून, या ठिकाणी दुतर्फा १-१.५ मीटर उंचीपर्यंत प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. येथे सुमारे २० फूट भराव करावा लागणार आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, नित्यानंद भागवत व अन्य नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर भरावाचे काम थांबवण्यात आले. हा भराव ऐन गणेशोत्सवात धोकादायक ठरू शकत होता तसेच पाऊस पडल्यास माती खचण्याची भीती होती. प्रशासनाने अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून हे काम थांबवल्यामुळे आता गणेशोत्सवासाठी मुंबई व पुण्यातून येणारे चाकरमानी सर्व्हिस रोडवरूनच प्रवास करतील.

पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई

प्रशासकीय पातळीवर सर्व्हिस रोडची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळूण शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उड्डाण पुलाखालील जागांची साफसफाई केली जात आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने कचरा व अडथळे हटवून सर्व्हिस रोडची रुंदी वाढवण्यात येत आहे.

आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून एकाच वेळी दोन ते तीन वाहने सहज मार्गस्थ होऊ शकतील, अशा प्रकारे रस्ता तयार केला जात आहे. वाशिष्टी नदीपासून सुरू होणारा उड्डाण पूल, बहादूरशेख चौकापर्यंतचा अरुंद सर्व्हिस रोड तसेच अतिथी हॉटेल ते पंचायत समितीदरम्यानच्या अरुंद रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून आवश्यक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोंडी फोडण्यासाठी ६ पथके व विशेष नियोजन

दि. ११, १२ व १३ सप्टेंबर रोजी मुंबई आणि पुण्याहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येणार आहेत. एसटी, खासगी गाड्या, कार व इतर वाहनांतून गणेशभक्त कोकणात दाखल होतील. मुंबई-गोवा महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याने यंदाचा प्रवास अधिक सुकर होणार असला, तरी चिपळूण शहरात कोंडी टाळण्यासाठी पोलिस, महसूल व महामार्ग विभागाने कंबर कसली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे ६ विशेष पथके तयार करण्यात आली असून बहादूरशेख पूल, वाशिष्टी पूल, शिवाजीनगर, पॉवर हाऊस, गुहागर बायपास रोड आदी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकात गर्दी होऊ नये म्हणून बाहेरगावाकडे सुटणाऱ्या गाड्या शिवाजीनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 11-09-2026