संगमेश्वर तालुक्यात जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होणार; १२ ते १६ सप्टेंबर दरम्यान रंगणार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील श्री देव गणपती व श्री मारुती देवस्थानच्या वतीने श्री देव गणपती धामापूर द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जन्मोत्सव सोहळा १२ सप्टेंबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात सुरू होत आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, सकाळी ८ वाजता सत्यविनायक पूजा पार पडेल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता स्मरणिका प्रकाशन सोहळा, सत्कार समारंभ व उपस्थितांचे मनोगत व्यक्त केले जाईल. रात्री १० ते ११ या वेळेत आरती, भोवत्या व मंत्रपुष्पांजली होईल, तर रात्री ११ ते १:३० या वेळेत ह.भ.प. श्री मोहकबुआ रायकर (डोंबिवली) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा
- १३ सप्टेंबर: सकाळी ८ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा व आवर्तने होतील. रात्री १० ते ११ या वेळेत आरती, तर ११ ते १ या वेळेत ह.भ.प.कु. तेजस्विनी जोशी (रत्नागिरी) यांचे कीर्तन रंगेल.
- १४ सप्टेंबर: सकाळी ८ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा होईल. रात्री १० ते ११ आरती, तर रात्री ११ ते १ या वेळेत ह.भ.प. श्रीनिवास पेंडसे (धामणी) यांचे जन्मोत्सावाचे कीर्तन होईल. उल्लेखनीय म्हणजे श्रींचा मुख्य सोहळा १४ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजता पार पडणार आहे.
- १५ सप्टेंबर: सकाळी ८ वाजता षोडशोपचार पूजा, सायंकाळी ५ ते ७ जन्मोत्सव काला व काला रात्री पार पडेल. रात्री १० ते १०.४५ आरती, तर १०.४५ ते ११.३० ह.भ.प. श्रीकांत फाटक (माखजन) यांचे कीर्तन होईल. त्यानंतर रात्री ११.३० ते १.३० दरम्यान ‘स्वररंग’ गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये गायक अमेय आकवे, प्राजक्ता लेले जोगळेकर, संवादिनी चैतन्य पटवर्धन, तबला प्रथमेश शहाणे, ताल वाद्य सुहास सोहनी आणि निवेदन अलका बेंदरकर यांचा सहभाग असेल.
महाप्रसाद आणि उत्सव समाप्ती
१६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची षोडशोपचार पूजा आणि दुपारी १२.३० वाजता श्रींचा महाप्रसाद वितरित केला जाईल. रात्री १० ते १२ या वेळेत आरती, भोवत्या, पुष्पांजली, तर रात्री १२ ते २ या वेळेत विविध गुणदर्शन कार्यक्रम रंगणार आहे. पहाटे २ वाजता ह.भ.प. श्रीकांत फाटक (माखजन) यांचे लळीताचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होईल.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 11-09-2026














