१२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक; आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचा जरांगे पाटलांचा दावा
जालना:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस पूर्ण झाला आहे. राज्य सरकारने त्यांच्या १२ मागण्या मान्य केल्याचे सांगितले असले, तरी वंशावळ आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी ठोस पुरावे दिल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही, अशी अट कायम ठेवली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे मागण्यांची पूर्णतः पूर्तता झालेली नसल्याचे स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
सरकारला दिलेल्या मुदतीची वेळ संपल्याने जरांगे पाटलांनी आता थेट मुंबईवर धडक मारण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची पुढील दिशा काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक आयोजित करत मराठा समाजाला एकवटण्याचे आवाहन केले आहे.
अंतरवालीत उद्या निर्णायक बैठक; घरी बसून टीव्ही पाहण्याचे दिवस संपले
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सर्व मराठा बांधवांना १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. आता अटीतटीचा सामना सुरू झाला असून, घरी बसून टीव्हीवर बैठक पाहण्याचे हे दिवस नाहीत. त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवाने शक्यतो प्रत्यक्ष बैठकीला हजर राहावे, कोणीही हलगर्जीपणा करू नये,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
आरक्षणाची ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून समाजासाठी प्रत्येकाने किमान एक दिवस द्यावा, असे त्यांनी नमूद केले. ज्यांना अंतरवालीत येणे शक्य होणार नाही, त्यांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्यावर उतरून आंदोलकांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, मुंबई प्रवासादरम्यान ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असेल, तेथील स्थानिक मराठा बांधवांनी जेवणाची व राहण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पाऊस-सणांचे संकट; पण मुंबई कूच निश्चित
मुंबई आंदोलनाची रूपरेषा मांडताना जरांगे पाटलांनी महिलांना या आंदोलनात न येण्याची विनंती केली आहे. “सध्या पावसाचे दिवस आहेत आणि अडीअडचणी मोठ्या आहेत. तसेच शेती आणि आरक्षणाचेही संकट समोर आहे. त्यामुळे महिलांनी गावातच राहून गाव सांभाळले तरी खूप झाले. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी काढून गाड्यांची व्यवस्था करावी. एका तालुक्यात आपण लाखापेक्षा कमी नाही. जोपर्यंत सरकारचे नाक दाबत नाही, तोपर्यंत सरकार तोंड उघडणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
सरकारने परवानगी दिली किंवा नाकारली, तरी आपण मुंबईला जाणारच यावर त्यांनी ठाम भर दिला. “मागील वेळी परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र यावेळी प्रशासन तसे करणार नाही अशी अपेक्षा आहे. जर मुंबईत आंदोलकांना त्रास देण्यात आला, तर राज्यभरात ठिकठिकाणी रस्ते अडवून ठेवा. न्यायदेवता गोरगरिबांच्या लेकरांवर कधीही अन्याय करत नाही,” असा विश्वास व्यक्त करत जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 11-09-2026














