Mumbai Goa Highway Inauguration: मुंबई-गोवा महामार्ग उद्घाटन नितीन गडकरी यांच्याच उपस्थितीत होणार – मंत्री नितेश राणे

गणेशोत्सवासाठी कोकणवासियांच्या सेवेत ‘मोदी एक्सप्रेस’ सज्ज; ११ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार रवाना

मुंबई:

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला झालेल्या अवाजवी विलंबाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच उघडपणे खंत व्यक्त केली होती. खरं तर हे महत्त्वाकांक्षी काम २०१६ पर्यंतच पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु गेल्या १५ वर्षांत या महामार्गाचे काम अवघे ९४ टक्केच पूर्ण होऊ शकले आहे. या पार्श्वभूमीवर, “काम पूर्ण झाल्यावर मी या महामार्गाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही,” असे विधान गडकरी यांनी पणजी येथील सहा पदरी उन्नत मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी केले होते. त्यांच्या या विधानावर आता राज्याचे मंत्री नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी महामार्गाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्याच हस्ते होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नितीन गडकरी यांच्या भूमिकेवर बोलताना नितेश राणे म्हणाले, “शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र आज जो काही दर्जेदार रस्ता तयार झाला आहे, तो केवळ त्यांच्याच पुढाकारामुळे आणि प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. हा रस्ता अतिशय चांगला आणि मजबूत झाला आहे. त्यामुळे आम्ही गडकरी साहेबांना नक्कीच आग्रहाचे निमंत्रण देऊ. गरज पडल्यास आम्ही त्यांना दिल्लीला घ्यायला जाऊ, पण मुंबई-गोवा महामार्गाचे उद्घाटन त्यांच्याच शुभहस्ते पार पडेल.”

गेल्या १४ वर्षांपासून गणेशभक्तांसाठी मोफत प्रवास सेवा

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई व आसपासच्या जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी नितेश राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेनचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल माहिती देताना राणे म्हणाले, “गेल्या १४ वर्षांपासून आम्ही कोकणवासियांच्या सेवेत आहोत. सुरुवातीच्या काही वर्षांत आम्ही विशेष बसेसची व्यवस्था केली होती, तर आता दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना केली जाते. वाजत-गाजत आणि भजनाच्या गजरात आमचे कोकणवासी या गाडीने प्रवास करतात. या प्रवासात जेवणापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात.”

यंदा ही ‘मोदी एक्सप्रेस’ ११ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर अशा दोन दिवशी कोकणाकडे रवाना होणार आहे.

कोकण हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला

आपल्या या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना नितेश राणे यांनी सांगितले की, “ज्या कोकणवासीयांमुळे आज आमचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व आहे, तीच आमची खरी ताकद आहे. कोकण हा कायमच भारतीय जनता पक्षाचा भक्कम बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे तेथील जनतेचा विकास करणे आणि त्यांची मनापासून सेवा करणे, याच मुख्य हेतूने आम्ही दरवर्षी मोदी एक्सप्रेसचे आयोजन करतो.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 11-09-2026