Pavitra Portal Shikshak Bharti Ratnagiri: पवित्र पोर्टल शिक्षक भरती: कामगिरीवरील शिक्षकांची अडचण; मुळ शाळेत परतण्याची वेळ

रत्नागिरी जिल्ह्यात ४५० शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया सुरू; सोयीच्या ठिकाणी गेलेल्या शिक्षकांना पुन्हा दुर्गम भागात जावे लागणार

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक भरती प्रक्रियेला मोठा वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ६७ रिक्त पदांपैकी सुमारे ४७८ पदे सध्या भरली जात आहेत. ही पदे भरल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षण सेवकांना थेट रिक्त दाखवलेल्या शाळांवर नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळेच सोयीच्या ठिकाणी कामगिरीवर (डेप्युटेशनवर) गेलेल्या शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झाली असून त्यांना आता आपल्या मूळ शाळेत परत जावे लागणार आहे.

नियमानुसार एखादी शाळा रिक्त दाखवून तिथे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन शिक्षक भरला जातो. परंतु प्रत्यक्षात त्या शाळेत जर कामगिरीवरील शिक्षक कार्यरत असेल, तर नव्या शिक्षकाच्या नियुक्तीवेळी जुन्या शिक्षकाला आपल्या मूळ शाळेत परत जावे लागणे अनिवार्य आहे. त्यामुळे सोयीच्या आणि सुकर ठिकाणी कामगिरीवर काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना आता पुन्हा दुर्गम व ग्रामीण भागातील मूळ शाळांमध्ये रूजू व्हावे लागणार आहे.

संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात बदल्या वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान, शिक्षकांना कामगिरीवर काढताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केवळ संगमेश्वर आणि राजापूर या दोन तालुक्यांमध्येच सुमारे ५० ते ६० शिक्षकांच्या कामगिरी बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या सोयीच्या तसेच बाजारपेठेजवळच्या शाळांमध्ये करून घेण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.

शिक्षकांना कामगिरीवर पाठवण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकाऱ्यांचे (BDO) असल्याने, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी झाल्यास संगमेश्वर आणि राजापूर या दोन्ही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी अडचणीत सापडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 11-09-2026