Ratnagiri Ganeshotsav 2026: रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ६६४ श्रीं च्या मूर्तींची होणार प्रतिष्ठापना

घरगुती गणपतींच्या संख्येत ११२ ने वाढ; जिल्ह्यातील १२० हून अधिक सार्वजनिक मंडळांमध्ये पारंपरिक उत्सवाची जय्यत तयारी

रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भाद्रपद चतुर्थीच्या तोंडावर संपूर्ण कोकणात गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली असून घराघरांमध्ये मंगलमय वातावरणात उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, यावर्षी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल.

गतवर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील घरगुती गणपतींच्या संख्येत ११२ ने वाढ झाली आहे, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नसून ती संख्या १२६ वर स्थिर आहे. कोकणातील या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या उत्सवासाठी मुंबई-पुण्यासह विविध शहरांतून चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या मूळ गावी दाखल होत आहेत.

पारंपरिक जाखडी आणि भक्तीमय वातावरण

कोकणातील संस्कृतीचा गाभा असलेल्या या उत्सवात दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती (सात दिवस) आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असे विविध कालावधीसाठी बाप्पांचे आदरातिथ्य केले जाते. घरोघरी भक्तिभावाने होणारी पूजा, सायंकाळच्या वेळी एकत्र येऊन गावकरी करत असलेली आरती आणि त्यानंतर अंगणात रंगणारे पारंपरिक ‘जाखडी नृत्याचे’ ताल हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.

Tata sierra

सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आणि प्रमुख मंडळे

जिल्ह्यात घरगुती उत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपराही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. यंदा शहरातील १०१ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेला टिळक आळीतील पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव, बंदररोड मित्रमंडळाचा उत्सव आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ‘लाल गणपती’ येथे विशेष तयारी सुरू आहे.

याशिवाय प्रशासकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने रत्नागिरी नगर परिषद कर्मचारी मंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक रुग्णालय, विशेष कारागृह आणि शहर पोलीस ठाणे या महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सर्वच ठिकाणी नियमावलीचे पालन करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलीस व प्रशासन सज्ज झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 12-09-2026