Ratnagiri Shetkari Karjmukti 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध!

आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांचे आवाहन; ‘अॅग्रीस्टॅक नोंदणी’ अनिवार्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची दुसरी यादी आज अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत नाव आलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Verification) करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले आहे.

कुठे पाहता येणार यादी?

पात्र शेतकऱ्यांची ही दुसरी यादी जिल्ह्यातील खालील ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे:

  • सर्व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये
  • विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय व सचिव
  • रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा
  • सर्व राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या शाखा

‘अॅग्रीस्टॅक नोंदणी’ (Farmer ID) अनिवार्य

Shanti 3

या योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे ‘अॅग्रीस्टॅक नोंदणी’ (फार्मर आयडी) असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप ही नोंदणी झालेली नाही, त्यांनी त्वरित जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

आधार प्रमाणीकरण कसे करावे?

कर्जमाफीची रक्कम मिळवण्यासाठी यादीतील पात्र शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘महा ई-सेवा केंद्रात’ जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सेवा केंद्रांना ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण

जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्र चालकांसाठी या प्रक्रियेबाबतचे विशेष ऑनलाइन प्रशिक्षण ‘जिल्हा प्रकल्प कार्यालय, महाआयटी, रत्नागिरी’ यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच यासंबंधीची सविस्तर कार्यपद्धती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये आणि सर्व सेवा केंद्रांवर उपलब्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 12-09-2026