गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईचे सावट; चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरीत ‘सीएनजी संपले’चे फलक
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो चाकरमानी लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणातील आपापल्या मूळ गावी रवाना होत आहेत. मात्र, गावी परतणाऱ्या या चाकरमान्यांच्या आनंदावर सीएनजी (CNG) तुटवड्यामुळे मोठे विरजण पडले आहे. महामार्गावरील बहुतांश पंपांवर गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.
पंपांवर ‘सीएनजी संपले’चे फलक
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी परिसरातील बहुतांश पेट्रोल व सीएनजी पंपांवर सध्या ‘सीएनजी संपला आहे’ असे फलक पाहायला मिळत आहेत. ज्या मोजक्या ठिकाणी गॅस उपलब्ध आहे, तेथे वाहनांच्या अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक तास वाट पाहूनही इंधन मिळत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक रिक्षाचालक अडचणीत
दरवर्षी सणासुदीच्या काळात उद्भवणाऱ्या या तांत्रिक अथवा कृत्रिम तुटवड्यामुळे प्रवाशांसोबतच स्थानिक रिक्षा व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. गणेशोत्सवाचा काळ हा रिक्षाचालकांसाठी हक्काच्या कमाईचा मानला जातो. मात्र, ऐन मोसमातच गॅस उपलब्ध नसल्याने अनेक रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 12-09-2026















