पावसाच्या उघडीपीमुळे मूर्ती वेळेत पूर्ण; सोमवारी हरितालिका आणि गणेश चतुर्थीचा दुग्धशर्करा योग
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील विविध मूर्तीशाळांमधून दूरच्या गावी आणि घरांमध्ये श्रींच्या मूर्ती रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. भाद्रपद महिना सुरू होताच पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात बाप्पांना घरी आणले जात आहे.
मूर्तींची रंगरंगोटी पूर्ण; अनुकूल वातावरणामुळे कामाला गती
गेल्या दोन महिन्यांपासून चाललेल्या कामांनंतर मूर्तिकारांनी मूर्तींच्या देखण्या रंगरंगोटीचे नाजूक काम एकाग्रतेने पूर्ण केले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मातीच्या मूर्ती आणि त्यांचा रंग व्यवस्थित वाळण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला. त्यामुळे कोणत्याही अडचणीविना मूर्ती अत्यंत वेळेत तयार झाल्याचे स्थानिक मूर्तिकारांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती यापूर्वीच मंडपांमध्ये स्थानापन्न झाल्या असून, आता घरगुती गणपतींचे ढोल-ताशांच्या तालात आगमन होत आहे.
महिलांची धावपळ आणि चाकरमान्यांचे आगमन
यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे घरोघरी महिलांची विशेष लगबग पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या बाजूला, मुंबई आणि पुण्याहून सोडण्यात आलेल्या एसटीच्या जादा गाड्या तसेच कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून लाखो चाकरमानी आपापल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. चाकरमान्यांच्या आगमनाने कोकणातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उत्सवाच्या तयारीला गती आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 12-09-2026















