गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी, चारचाकी आणि एसटी बसेसना दिलासा
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख आंबा घाटात दोन दिवसांपूर्वी रस्त्याखालील दरडीचा काही भाग कोसळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहने आणि खासगी लक्झरी बसेससाठी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या या मार्गावर वाहतुकीला मोठा अडथळा नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग दुचाकी, चारचाकी वाहने आणि एसटी बसेससाठी एकेरी स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन महिन्यांपासून वाहतुकीत सतत अडथळे
देवरुख परिसराला जोडणारा आंबा घाट गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीच्या अडथळ्यात सापडला आहे. यापूर्वी दरड कोसळल्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून तात्काळ माती व दगड बाजूला करून मार्ग मोकळा केला जात होता. मात्र, महिनाभरापूर्वी दोन्ही बाजूंनी दरड असलेल्या संवेदनशील भागात रस्ता अधिकच खराब झाल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा मार्ग काही दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता.
प्रशासनाकडून पाहणी अन् तात्पुरता दिलासा
मार्गाची गंभीर स्थिती पाहता रत्नागिरी व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार किरण सामंत यांनी प्रत्यक्ष आंबा घाटात जाऊन पाहणी केली व वस्तुस्थितीचा आढावा घेतला.
गणेशोत्सव अवघ्या तोंडावर आल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची व स्थानिक प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने हा मार्ग हलक्या वाहनांसाठी आणि एसटी महामंडळाच्या बसेससाठी एकेरी स्वरूपात मोकळा करून दिला आहे. मात्र सुरक्षेचे कारण समोर ठेवून अवजड वाहतूक आणि खाजगी लक्झरी बसेसना अद्याप घाटात प्रवेश मनाई आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 12-09-2026















