९ तालुक्यांतील पक्षकारांसाठी सुवर्णसंधी; तडजोडीच्या आधारे जलद न्यायासाठी आवाहन
रत्नागिरी:
Ratnagiri Revenue Lok Adalat च्या माध्यमातून जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित अर्धन्यायिक प्रलंबित अपील प्रकरणांचा तातडीने आणि सामोपचाराने निपटारा व्हावा, या उद्देशाने २२ सप्टेंबर रोजी ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोकअदालत’ आयोजित करण्यात आली आहे. ही लोकअदालत दुपारी १ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
वेळ व न्यायालयीन खर्च वाचवून जलद न्याय
पक्षकारांमधील वाद सामोपचाराने आणि सामंजस्याने मिटवणे, नागरिकांचा वेळ व न्यायालयीन खर्च वाचवणे तसेच त्यांना जलद न्याय मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार आपापसातील संमतीने वाद मिटवण्यास तयार आहेत, अशा दाव्यांचा या लोकअदालतीमध्ये तातडीने निकाल लावला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, लांजा आणि राजापूर या सर्व नऊ तालुक्यांतील अपीलकर्ते व पक्षकार या लोकअदालतीचा लाभ घेऊ शकतात.
Ratnagiri Revenue Lok Adalat: ‘प्रपत्र अ’ अर्ज आणि संपर्क
महसूल व वन विभागाच्या नियमांनुसार इच्छुक पक्षकारांना ‘प्रपत्र अ’ मधील ‘महसूल लोकअदालत तडजोडनामा’ अर्ज भरावा लागेल. परस्परसंमतीच्या (Consent Terms) आधारे या प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे.
या संदर्भातील अधिक माहिती व तांत्रिक मार्गदर्शनासाठी नागरिकांनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या ०२३५२-२२२८६३ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्ह्यातील नागरिकांनी या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने सोडवावीत, असे आवाहन भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांनी केले आहे.













