रत्नागिरीतील आठवडा बाजारात क्रूझर पेटवणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश; वाद मिटवण्यासाठी आलेल्या चालकाची गाडी पेटवली, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरीतील आठवडा बाजारात क्रूझर पेटवणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश; वाद मिटवण्यासाठी आलेल्या चालकाची गाडी पेटवली, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

संगिता लॉजच्या पार्किंगमधील घटना; काचा फोडून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवली गाडी; क्रांतीनगरमधील एकावर गुन्हा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्हा नोंदवून आरोपीची ओळख पटवली आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या सांगलीतील चालकावर राग धरून, संगिता लॉजच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या क्रूझर गाडीच्या काचा फोडून तिला ज्वलनशील पदार्थाने पेटवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी क्रांतीनगर येथील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक वाद मिटवण्याच्या रागातून पेटवली गाडी

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील रहिवासी व चालक अशोक नाराप्पा गोटेकर (वय २७) हे आरोपी आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) आणि त्याच्या पत्नीमधील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी रत्नागिरीत आले होते. त्यांनी आपली ‘फोर्स’ कंपनीची क्रूझर गाडी (क्र. MH 10 BN 7152) आठवडा बाजार येथील संगिता लॉजच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती. मात्र, आपण वाद मिटवण्यासाठी आलो याचा राग आकाश खेत्री याच्या मनात होता.

infigo

काचा फोडून आत ज्वलनशील पदार्थ टाकला

याच रागाच्या भरात आरोपी आकाश खेत्री याने १७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत लॉजच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला. त्याने क्रूझर गाडीच्या पुढील व बाजूच्या काचा फोडल्या आणि वाहनात आत ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले. या आगीत गाडीचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती.

रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी चालक अशोक गोटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी आकाश चंद्रकांत खेत्री याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२६(f) अन्वये आगळीक करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.