१९, २३, २५ आणि २६ सप्टेंबरला दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत नवे नियम; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे आदेश
रत्नागिरी : शहरात गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणारी प्रचंड गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रत्नागिरी शहर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. सुरक्षितता आणि सुरळीत वाहतुकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भातील अधिकृत वाहतूक नियंत्रण आदेश जारी केले आहेत.
या चार दिवशी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत बदल लागू
विसर्जनाच्या प्रमुख दिवशी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन खालील चार दिवशी दुपारी २.०० ते रात्री १२.०० या वेळेत वाहतूक मार्गातील बदल लागू राहतील:

१९ सप्टेंबर : गौरी-गणपती विसर्जन
२३ सप्टेंबर : दहा दिवसांचे गणपती विसर्जन
२५ सप्टेंबर : अनंत चतुर्दशी विसर्जन
२६ सप्टेंबर : अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस
असा असेल नवा पर्यायी मार्ग
मांडवी समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या नेहमीच्या मार्गावर बदल करण्यात आला आहे. भुतेनाका – भंडग तिठा – मांडवी समुद्रकिनारा हा पारंपरिक मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी ही वाहतूक भुतेनाका – मिरकरवाडा तिठा – मत्स्यालय ते मांडवी समुद्रकिनारा या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
मांडवी किनाऱ्यावर केवळ विसर्जन वाहनांनाच प्रवेश
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनाच्या वेळी एकाच वेळी सुमारे ७ ते ८ हजार भाविक आणि विसर्जन सोहळा पाहणारे नागरिक एकत्र येतात. त्यामुळे निर्माण होणारी अभूतपूर्व गर्दी आणि पार्किंगची समस्या टाळण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात केवळ गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणत्याही खासगी वाहनांना या परिसरात जाण्यास सक्त मनाई असेल.
अत्यावश्यक सेवांना नियमातून सूट
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशामक दलाचे बंब, रुग्णवाहिका आणि व्हीआयपी/शासकीय दौऱ्याशी संबंधित अधिकृत वाहनांना लागू असणार नाही. तसेच आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळावर तैनात पोलीस अधिकाऱ्यांना वाहतुकीबाबत योग्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या बदलांविषयी काही हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













