“आपली मांडवी… आपली जबाबदारी!”; रत्नागिरीकरांना स्वच्छता महाअभियानात सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी : "आपली मांडवी… आपली जबाबदारी!" हा सामाजिक संदेश देत आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीच्या ऐतिहासिक व निसर्गरम्य मांडवी समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सागरी सीमा मंच, रत्नागिरी’ यांच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. शहराची प्रतिमा आणि पर्यटनाचे भवितव्य जपण्यासाठी सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा मलीन होण्याची चिंता
रत्नागिरी शहराची सुंदर ओळख असलेला मांडवी समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, अलीकडच्या काळात किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने आणि अस्वच्छतेमुळे किनाऱ्याचे सौंदर्य धोक्यात येत आहे. आज सोशल मीडियाच्या युगात मांडवीच्या विलोभनीय रूपाचे फोटो जितक्या वेगाने जगभर पोहोचतात, तितक्याच वेगाने कचरा आणि अस्वच्छतेचे फोटोही व्हायरल होतात. यामुळे केवळ मांडवीचीच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी शहराची प्रतिष्ठा मलीन होत असल्याबद्दल ‘सागरी सीमा मंच’ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
प्रत्येक रत्नागिरीकराच्या स्वाभिमानाचा लढा
हा प्रश्न केवळ नगरपरिषद किंवा शासकीय प्रशासनावर सोडून चालणार नसून प्रत्येक रत्नागिरीकराच्या स्वाभिमानाचा आणि कर्तव्याचा आहे. मांडवी किनाऱ्याचे गतवैभव कायम राखण्यासाठी आणि परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शहरवासीय, तरुण, सामाजिक संस्था आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अभियानाचा तपशील :
दिनांक : रविवार, २० सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ७.३० ते ९.३०
स्थळ : मांडवी समुद्रकिनारा, रत्नागिरी
आयोजक : सागरी सीमा मंच, रत्नागिरी
"कचरा करू नका… कचरा दिसला तर उचलूया!" हा संकल्प घेऊन "सुंदर मांडवी… स्वच्छ मांडवी… अभिमानाची रत्नागिरी!" हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी रविवारी सकाळी मांडवी किनाऱ्यावर एकत्र यावे, असे आवाहन सागरी सीमा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.













