Ratnagiri Health Checkup Movement: गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या आरोग्यासाठी रत्नागिरीत १६ वैद्यकीय पथके तैनात; ४३५ प्रवाशांची तपासणी

Ratnagiri Health Checkup Movement: गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या आरोग्यासाठी रत्नागिरीत १६ वैद्यकीय पथके तैनात; ४३५ प्रवाशांची तपासणी

खेड, चिपळूण, संगमेश्वरसह प्रमुख प्रवेशद्वारांवर आरोग्य पथके सज्ज; आजारी रुग्णांच्या निगा राखण्यासाठी ‘ट्रेसिंग’ यंत्रणा सक्रिय

Ratnagiri Health Checkup Movement अंतर्गत गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महानगरांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि प्रवेशद्वारांवर १६ विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. १० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ४३५ प्रवाशांची कसून आरोग्य तपासणी करण्यात आली असून, लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर तात्काळ औषधोपचार करण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खबरदारीचा उपाय

नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात राहणारे लाखो चाकरमानी बाप्पाच्या आगमनाला गावी येतात. या प्रवाशांसोबत विविध आजार ग्रामीण भागात पसरू नयेत, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आली आहे.

tata motars

प्रमुख तालुक्यांमध्ये १६ मोक्याच्या ठिकाणी तपासणी केंद्रे

आरोग्य विभागाने खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकेबंदीसारखी केंद्रे उभारली आहेत. यामध्ये खेडमधील भरणे नाका, दाभीळ फाटा व रेल्वे स्टेशन; चिपळूणमधील पेढे-सवतसडा, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका व रेल्वे स्टेशन; संगमेश्वरमधील एस.टी. स्टँडजवळील पूल व देवरुख-मुर्शी चेकपोस्ट; रत्नागिरीतील हातखंबा तिठा व रेल्वे स्टेशन; लांज्यातील वेरळ व कुवे गणपती मंदिराचा परिसर आणि राजापूर येथील एस.टी. स्टँड या १६ ठिकाणी तपासणी केली जात आहे.

‘ट्रेसिंग’ यंत्रणेद्वारे गावागावांत रुग्णांवर विशेष लक्ष

तपासणीदरम्यान प्रामुख्याने सर्दी, खोकला, विशेष ताप, कावीळ आणि अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचारांसह नमुने संकलन केले जात आहे. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘ट्रेसिंग’ यंत्रणा; यामध्ये आजारी रुग्ण कोणत्या गावात जाणार आहे आणि किती दिवस थांबणार आहे याची नोंद घेऊन, संबंधित स्थानिक आरोग्य केंद्राला सतर्क केले जात आहे.

लक्षणे आढळल्यास आजारपण न लपवण्याचे आवाहन

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांनी कोणतीही आजाराची लक्षणे दिसल्यास स्वतःच्या मनाने औषधे न घेता शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.