रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या समस्येबाबत रत्नागिरीकर आक्रमक; “कोणाचा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?” नागरिकांचा संतप्त सवाल

रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या समस्येबाबत रत्नागिरीकर आक्रमक; "कोणाचा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?" नागरिकांचा संतप्त सवाल

मारुती आळीतील अपघातानंतर संतापाचा भडका; निवडणुकीतील आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप, तातडीने उपाययोजनेची मागणी

Gim trainer

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि उपनगरांमध्ये ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट आणि उनाड गुरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मारुती आळीत गुरांच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाल्याच्या ताज्या घटनेनंतर शहरवासीयांचा संयम सुटला असून, "एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच नगरपालिकेला जाग येणार का?" असा संतप्त सवाल आता रत्नागिरीकरांकडून विचारला जात आहे.

मारुती आळीतील दुर्घटनेने उडाली घबराट

शहरातील गजबजलेल्या मारुती आळी परिसरात कालच भरधाव धावणाऱ्या गुरांच्या टोळक्याने एका पादचारी महिलेला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत महिला हवेत उडून रस्त्यावर आदळल्याने गंभीर जखमी झाली. भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे बाजारपेठेत घबराट पसरली असून, अशा प्रकारे मोकाट जनावरांचा हैदोस सुरू राहिल्यास भविष्यात याहून मोठा आणि प्राणघातक अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

cake of the day

निवडणुकीतील आश्वासनांचे काय झाले?

रस्त्यावर बसणारी जनावरे वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी ‘यमदूत’ ठरत असताना नगरपालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीच्या काळात शहराला मोकाट जनावरांच्या त्रासातून मुक्त करण्याचे, कोंडवाडे सुरू करण्याचे आणि आधुनिक गोशाळा उभारण्याचे दिलेले मोठमोठे वायदे केवळ कागदावरच राहिले का, असा थेट सवाल नागरिक करत आहेत.

मोठा बळी जाण्याआधी ठोस उपाययोजना करा

शहरात गुरांचा असाच मोकाट संचार सुरू राहिला तर रोज निष्पाप नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागेल. त्यामुळे आता प्रशासनाने केवळ दिखाऊ नोटिसा न काढता, रस्त्यावरील जनावरांना तातडीने पकडण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी आणि त्यांच्या मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी संपूर्ण शहरातून होत आहे.