मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेस कार्यकारिणीत महत्त्वाचे ठराव मंजूर
नवी दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (CWC) अडीच तासांच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पूर्णपणे तडजोड केली असून देशातील संपूर्ण निवडणूक प्रणाली ‘फिक्स’ करण्यात आली आहे, असा थेट दावा करत अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केला.
ईव्हीएम आणि मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप
राहुल गांधी बैठकीत बोलताना म्हणाले की, "ईव्हीएम (EVM) असो वा मतदार यादी, दोन्ही यंत्रणांमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करण्यात आला आहे. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा एक रणनीती म्हणून गैरवापर करत आहे." या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, एसआयआर (SIR) प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी आणि मतदार यादीतून वगळलेली १३ कोटी ३० लाख नावे पुन्हा समाविष्ट केली जावीत, अशा प्रमुख मागण्यांचे ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले. या बैठकीस ६८ सदस्य उपस्थित होते.

"ज्ञानेश कुमार मोदी सरकारचे बाहुले"; मल्लिकार्जुन खरगे अन् प्रियंका गांधी आक्रमक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मोदी सरकारचे बाहुले बनल्याची टीका केली. तरुणांना मतदानापासून रोखण्यासाठी ‘फॉर्म ६’ मधील नियम बेकायदेशीरपणे बदलल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
संसदेत आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा
काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, निवडणूक प्रणालीतील हस्तक्षेपाबाबत पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, परंतु त्यांच्याकडे ती स्वीकारण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. खासदार कुमारी सेलजा यांनी देश वाचवण्यासाठी संपूर्ण पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष हा मुद्दा संसदेत आणि रस्त्यावर उतरून लावून धरणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.













