उर्वरित ६ तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव; सप्टेंबरमधील पावसाबद्दलची दडी ठरली घातक; यंदा भाताचे उत्पादन ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याने भात व नाचणीची शेती मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर, आता उर्वरित ६ तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव कृषी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत सुमारे २ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
९८३ मि.मी. कमी पाऊस; उत्पादन ३० ते ३५ टक्क्यांनी घटणार रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ३ हजार १४२ मि.मी. पाऊस पडतो; मात्र यंदा केवळ २ हजार ६८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत तब्बल ९८३ मि.मी. (१४.६ टक्के) पाऊस कमी झाला आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेली भातशेती करपून गेली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात भाताचे उत्पादन ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील लागवड आणि दुष्काळी परिस्थिती खरीप हंगामात जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर भात तर ५ हजार ६०० हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे. पहिल्या ‘ट्रिगर’नुसार शासनाने रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.
- रत्नागिरी तालुका: ६,९०० हेक्टर भात + ७१५ हेक्टर नाचणी (एकूण ७,६१५ हेक्टर)
- राजापूर तालुका: ६,३६८ हेक्टर भात + ६९० हेक्टर नाचणी (एकूण ७,०५८ हेक्टर)
- संगमेश्वर तालुका: ८,३०३ हेक्टर भात + १०० हेक्टर नाचणी
आणखी १५ हजार हेक्टरचे होणार पंचनामे उर्वरित ६ तालुक्यांतील गंभीर परिस्थिती पाहता तेथेही दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोनदा शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. सध्या महसूल आणि कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे केले जात आहेत. आतापर्यंत २ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, आगामी दिवसांत आणखी १५ हजार हेक्टरवरील भातशेतीचे पंचनामे केले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
“कमी पावसामुळे पहिल्या ट्रिगरमध्ये राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे. २ हजार हेक्टरपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी व महसूलचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. कोणतीही नुकसानभरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहू नये, म्हणून सर्वांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करावे. उर्वरित ६ तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे.”
– शिवकुमार सदाफुले (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 05-10-2026














