मराठी माध्यमाचे २१४ आणि उर्दू माध्यमाचे ८ उमेदवार; नोव्हेंबर अखेरपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होण्याचा अंदाज
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विशेषतः गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या २२४ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज, सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात पार पडत आहे.
२२४ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी या भरती प्रक्रियेत मराठी माध्यमातील २१४ आणि उर्दू माध्यमातील ८ अशा एकूण २२४ उमेदवारांचा समावेश आहे. एकाच दिवसात सर्व कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पडताळणीदरम्यान सर्व कागदपत्रे वैध आणि पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना समुपदेशन (काउंसलिंग) पद्धतीद्वारे शाळांचे वाटप करून तात्काळ नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व नवनियुक्त शिक्षक आपापल्या शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिक्त पदांमुळे गुणवत्तेवर होतोय परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि अभ्यासावर मोठा परिणाम होत होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण १ हजार १७ शिक्षकांची पदे रिक्त आहेत; ज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांसह सुमारे ४७० पदवीधर शिक्षकांच्या जागांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ४५७ शिक्षकांची नियुक्ती यापूर्वी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत ४५७ शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. यामध्ये इंग्रजी आणि गणित विषयाच्या सुमारे २५० पदवीधर शिक्षकांचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेला गती मिळाल्याने आणि २२४ नवीन शिक्षक उपलब्ध होणार असल्याने जिल्हा परिषद शाळांचा शिक्षक अनुशेष कमी होण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 05-10-2026














