नवीन इमारतीच्या पार्श्वभूमीवर जुनी वास्तू पाडणार; माजी व विद्यमान कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या भावनिक भावना
Chiplun Municipal Council Building : चिपळूण शहराच्या वैभवात भर घालणारी आणि अनेक दशकांचा इतिहास जपणारी चिपळूण नगर परिषदेची ऐतिहासिक वास्तू आता निरोपाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. या ऐतिहासिक वास्तूत दीर्घकाळ सेवा बजावलेल्या माजी व विद्यमान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या वास्तूबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
नवीन इमारतीच्या कामामुळे स्थलांतर
चिपळूण नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सध्या सुरू झाले आहे. या नवीन कामापूर्वी ही जुनी ऐतिहासिक इमारत पाडण्यात येणार आहे. यामुळे पालिकेतील सर्व विभाग सध्या अन्यत्र तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहेत. या वास्तूबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना राजेंद्र खातू म्हणाले की, चिपळूण नगर परिषदेच्या या सुंदर, कलात्मक आणि ऐतिहासिक वास्तूने आम्हाला घडवले, ज्ञान दिले आणि आमच्या आयुष्याला नवी दिशा दिली. येथील प्रत्येक खोली, लाकडी जिना आणि भिंतींमध्ये आमच्या अनमोल आठवणी जपल्या गेल्या आहेत. नवीन वास्तू नक्कीच उभी राहील, मात्र या ऐतिहासिक इमारतीशी जोडलेले ऋणानुबंध आणि तिच्या देखण्या रचनेच्या आठवणी सदैव हृदयात राहतील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवासाची साक्षीदार
ही वास्तू अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवासाची मूक साक्षीदार ठरली असून नगर परिषदेच्या कामकाजात हिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील प्रत्येक विभाग आणि लाकडी जिना कर्मचाऱ्यांच्या कार्याची व योगदानाची साक्ष देतो. नवीन प्रशासकीय इमारत जरी लवकरच उभी राहणार असली, तरी या जुन्या वास्तूशी जुळलेले भावनिक नाते कायम राहील, अशी भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांच्या आठवणींचा ठेवा जपणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूला निरोप देताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली आहे.














