हर्णै बाजारपेठेतील प्रकार; आयटस स्पोर्ट्स कंपनीच्या नावाने बनवले खोटे प्रमाणपत्र
Fake Boat Training Certificate Case : बोट चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार दापोली तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी हर्णै बाजारपेठ येथील मयूरेश आंबुर्ले (वय ३४) याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट नरेंद्र लाड (वय ३९, रा. रोहा, जि. रायगड, सध्या रा. पनवेल, नवी मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अनिल नारायण रघुवीर, जगदीश काशिनाथ पावस आणि अनिकेत वामन रघुवीर (तिघेही रा. हर्णै, ता. दापोली) यांनी ‘आयटस स्पोर्ट्स अँड सेफ्टी प्रा. लि.’ या कंपनीकडून पॉवर बोट हँडलिंग आणि लाइफ सेविंग टेक्निकचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण घेतले नव्हते.
असे असतानाही, संशयित आरोपी मयूरेश आंबुर्ले याने या तिघांना बोट चालविण्याचा परवाना मिळवून देण्यासाठी संबंधित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत प्रशिक्षण घेतल्याचे खोटे आणि बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले. अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले असून, दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.














