माखजन, संगमेश्वर आणि देवरुख परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा; दिवाळीच्या जादा वाहतुकीत नवीन सेवेचा प्रारंभ
New ST Bus Service : माखनजन, संगमेश्वर आणि देवरुख परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कुरुंदवाड आगारामार्फत कुरुंदवाड-नृसिंहवाडी, कोल्हापूर-देवरुख आणि संगमेश्वर-माखनजन ही नवीन बससेवा आगामी १ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या जादा वाहतुकीअंतर्गत सुरू केली जात आहे. या बससेवेमुळे कोल्हापूर ते संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांना थेट प्रवासाची सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांची जुनी मागणी प्रत्यक्षात
माखनजन ते कोल्हापूर या मार्गावर थेट बससेवा सुरू करावी, अशी मागणी या परिसरातील प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सतत केली जात होती. अखेर कुरुंदवाड आगाराने या मागणीची दखल घेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र समाधान व्यक्त होत असून सणासुदीच्या काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी वर्गासाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा बस बदलण्याचा त्रास कमी होऊन प्रवास अधिक सुटसुटीत होणार आहे.
कायमस्वरूपी सुरू होण्याची शक्यता
सध्या ही बससेवा दिवाळीच्या जादा वाहतुकीअंतर्गत सुरू केली जात असली, तरी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माखनजन, संगमेश्वर आणि देवरुख परिसरातील सर्व प्रवाशांनी या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी प्रत्यक्षात येत असल्याने या बससेवेला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.














