निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम; प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सामूहिक प्रतिज्ञा
Vigilance Awareness Week : ‘जीवनाच्या सर्व क्षेत्रात सव्वेपणा आणि कायद्याचे काटेकोर पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणारही नाही, सर्व कामे संपूर्ण प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने करेन,’ अशी सामूहिक शपथ निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी दिली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
*भ्रष्टाचाराविरुद्ध अखंड लढा देण्याची सामूहिक शपथ
*जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या विशेष कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध अखंड लढा देण्याची व सचोटीची सामूहिक शपथ घेतली. भ्रष्टाचार या अनिष्ट प्रवृत्तीच्या समूळ उच्चाटनासाठी केवळ प्रशासनच नव्हे, तर नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्वांनीच एकजुटीने काम करण्याची गरज आहे. प्रत्येकने दक्ष नागरिक म्हणून जगताना प्रामाणिकपणाची सर्वोच्च मूल्ये जपली पाहिजेत, असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, उपजिल्हाधिकारी रोहिणी राजपूत, तहसीलदार संजय भालेराव, बजरंग चौगुले यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














