लांजा तालुक्यातील खावडी केंद्राचे केंद्रप्रमुख; शिक्षण क्षेत्रातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
District General Secretary Selection : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी लांजा तालुक्यातील खावडी केंद्राचे केंद्रप्रमुख उमेश केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षे लांजा तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या उमेश केसरकर यांची नुकतीच केंद्रप्रमुख पदी नियुक्ती झाली होती, आणि सध्या ते खावडी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
संघटनेच्या सभेत घेण्यात आला निर्णय
संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार उमेश केसरकर यांची रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकृत पत्र त्यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव व राज्य नेते बाबाजी शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जबाबदाऱ्या आणि मार्गदर्शक सूचना
संघटनेच्या वाढीसाठी आणि केंद्रप्रमुखांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी तन-मन-धनाने सहकार्य करावे, तसेच वेळोवेळी सभासदांशी चर्चा करून मीटिंगाचे आयोजन करावे आणि वरिष्ठ पातळीवर त्यांचे प्रश्न सोडवण्यात सातत्य ठेवावे, असे या नियुक्ती पत्रात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल उमेश केसरकर यांच्यावर संपूर्ण लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्हा शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.














