Ratnagiri QR Code Fertilizer Scheme Failure: राज्य शासनाच्या क्यूआर कोड आधारित खत विक्री योजनेत रत्नागिरीची कामगिरी निराशाजनक; ५ महिन्यांत अवघी २४ टक्के विक्री

Ratnagiri QR Code Fertilizer Scheme Failure: राज्य शासनाच्या क्यूआर कोड आधारित खत विक्री योजनेत रत्नागिरीची कामगिरी निराशाजनक; ५ महिन्यांत अवघी २४ टक्के विक्री

५ महिन्यांत अवघ्या ३१४ शेतकऱ्यांनाच झाले खत वाटप; ७८.६२ टक्के राज्याच्या सरासरीच्या तुलनेत रत्नागिरी जिल्हा तळाला

रत्नागिरी: Ratnagiri QR Code Fertilizer Scheme Failure संदर्भात राज्य शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या क्यूआर कोड आधारित खत विक्री योजनेत रत्नागिरी जिल्ह्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक आणि चिंताजनक राहिल्याचे समोर आले आहे. गत ५ जून ते २६ ऑक्टोबर या तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार २९९ खत बुकिंगची नोंद झाली असून, त्यापैकी प्रत्यक्ष अवघ्या ३१४ शेतकऱ्यांनाच खताची विक्री झाली आहे.

बुकिंगच्या तुलनेत प्रत्यक्ष खत विक्रीचे हे प्रमाण अवघे २४ टक्के इतकेच आहे. संपूर्ण राज्याची सरासरी ७८.६२ टक्के असताना त्या तुलनेत जिल्ह्याची ही कामगिरी कमालीची खालावली आहे. यावरून क्यूआर कोड आधारित खत विक्रीत रत्नागिरी जिल्हा राज्यभरात सर्वात तळाला गेल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

५ महिन्यांत अवघे ४३ मेट्रिक टन खताचे वितरण
शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर तासन् तास रांगेत उभे राहावे लागू नये आणि होणारी पळापळ टाळता यावी, यासाठी शासनाने घरबसल्या ‘एफएफएस’ (FFS) ॲपद्वारे क्यूआर कोड दाखवून खत विक्रेत्यांकडून खत खरेदी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. या योजनेची सुरुवात कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरीसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती.

Shanti real estate 1

मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत ११५ मेट्रिक टन खताचे बुकिंग झाले असताना, प्रत्यक्षात केवळ ४३ मेट्रिक टन खताचीच विक्री होऊ शकली. विशेष म्हणजे, २६ ऑक्टोबर रोजी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात केवळ १० खत बुकिंगची नोंद झाली असून, त्यातील अवघ्या ५ शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष खत विक्री झाली आहे. या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेल्या जनजागृतीचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे ही आधुनिक प्रणाली जिल्ह्यात पुरती कोलमडल्याचे दिसून येत आहे.