Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर जोरदार टीका; राहुल गांधींना लक्ष्य करत ‘रेजीम चेंज’च्या षडयंत्राचा केला दावा

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर जोरदार टीका; राहुल गांधींना लक्ष्य करत 'रेजीम चेंज'च्या षडयंत्राचा केला दावा

देशामध्ये संविधान आणि लोकशाही धोक्यात आणण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू असल्याचा केला गंभीर आरोप

"देशाला मोदीजी हवे आहेत, आणि आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत," असे स्पष्ट मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांना देशात अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांचे सरकार आणि अतिडावी व्यवस्था उभी करायची आहे. ही लढाई भाजप, एनडीए किंवा मोदींच्या विरोधात नसून देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी आहे. जोपर्यंत निर्माण झालेले संकट संपत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इंदिरा गांधींच्या काळापासून संविधानाशी छेडछाड

संविधान बदलण्याचे आणि पायदळी तुडवण्याचे काम काँग्रेसने इतिहासामध्ये अनेकदा केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. इंदिरा गांधी यांच्या काळाचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांची निवडणूक अवैद्य ठरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता, मात्र काँग्रेसने पाशवी बहुमताच्या आधारे संविधानावर पंतप्रधानांना स्थान देण्याचा प्रयत्न केला. १९७६ साली काँग्रेसने नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवले होते आणि सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली होती. पुढे १९७७ मध्ये मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी संविधान संशोधन करून देशाच्या पंतप्रधानांना संविधानाच्या खाली आणले आणि मूलभूत अधिकार बहाल केले, असे त्यांनी नमूद केले.

Hotel star caters

‘रेजीम चेंज’ आणि लाल पुस्तकावरून टीका

बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणे भारतातही ‘रेजीम चेंज’ करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. काँग्रेसचे नेते हातात लाल रंगाचे पुस्तक घेऊन फिरतात, मात्र त्या पुस्तकाचे आवरण लाल असले तरी आत काहीच नाही, असा टोला त्यांनी लगावला. हेच ते लाल पुस्तक आहे, ज्याचा वापर करून फ्रान्स आणि डेन्मार्कसारख्या देशांमध्ये अराजकता निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘रेजीम चेंज’चा अर्थ नेमका काय आहे, हे त्यांना माहीत आहे किंवा नाही, पण तेही याचे समर्थन करत आहेत. जोपर्यंत शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत देशात ‘रेजीम चेंज’ होऊ देणार नाही आणि लोकशाहीवर संकट येऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.