Glenn Maxwell retirement: ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; ‘द बिग शो’च्या ऐतिहासिक कारकिर्दीचा अंत

Glenn Maxwell retirement: ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; 'द बिग शो'च्या ऐतिहासिक कारकिर्दीचा अंत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेल्या मॅक्सवेलने आता टी-20 आणि कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘द बिग शो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलच्या शानदार कारकिर्दीचा अखेर शेवट झाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी जगभरातील टी-20 फ्रँचायझी लीगमध्ये त्याचा धडाका कायम राहणार असून चाहत्यांना विविध लीगमध्ये त्याचा स्फोटक खेळ पाहायला मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि ऐतिहासिक कामगिरी

ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अनेक अविस्मरणीय कामगिरींनी सजलेली आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेली त्याची नाबाद २०१ धावांची खेळी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. एका वेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ९१ धावांवर ७ बाद अशी असताना, मॅक्सवेलने किल्ला लढवत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. याशिवाय, त्याच विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या ४० चेंडूंमध्ये शतक झळकावत त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला.

Smruddhi homes

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधील दबदबा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मॅक्सवेलने आपल्या फलंदाजीची जोरदार छाप सोडली आहे. या प्रकारात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे अव्वल स्थानावर असून, त्याच्या नावावर पाच टी-20 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले येथे झळकावलेली नाबाद १४५ धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक संस्मरणीय खेळींपैकी एक आहे. विशेष म्हणजे, २०१५ आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा, तसेच २०२१ च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचाही तो एक महत्त्वाचा सदस्य होता.

कसोटी क्रिकेटमध्ये मॅक्सवेलची कारकीर्द तुलनेने छोटी राहिली. त्याने ऑस्ट्रेलियासाठी सात कसोटी सामने खेळले आणि ३३९ धावा केल्या, ज्यामध्ये भारताविरुद्ध रांची येथे झळकावलेल्या १०४ धावांच्या शतकाचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आठ बळीही टिपले.

तिन्ही प्रकारांतील मॅक्सवेलची आकडेवारी

एकदिवसीय क्रिकेट: मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी १४९ सामने खेळले असून, १२६.४० च्या स्ट्राइक रेटने ३,८9५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४ शतके आणि २३ अर्धशतके आहेत, तर गोलंदाजीत त्याने ७७ बळी घेतले.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट: त्याने ११० हून अधिक सामने खेळताना १५० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने २,६०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश असून, गोलंदाज म्हणून त्याने ४४ बळी घेतले आहेत.

कसोटी क्रिकेट: ७ सामन्यांमध्ये ३३९ धावा आणि ८ बळी अशी त्याची कसोटी कारकीर्द राहिली आहे.