समाजातील अंध व दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसाठी परशुरामनगर येथे नवीन तपासणी कक्ष
रत्नागिरी – चिपळूण येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) आय हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण तपासणी कक्षाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. समाजातील अंध, दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार नेत्रउपचार उपलब्ध करून देण्याचे नॅब संस्थेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, आरोग्यसेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असे गौरवोद्गार आमदार शेखर निकम यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमादरम्यान आमदार निकम यांनी संस्थेचे अध्यक्ष निलेश भुरण, कार्यवाह भरत नांदगावकर, खजिनदार नयन साडविलकर आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्कराज नारखेडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीच्या सेवाभावी वृत्तीचे विशेष कौतुक केले. डोळे हा मानवी शरीराचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा अवयव असल्याने नागरिकांमध्ये नेत्रआरोग्याबाबत सातत्याने जागृती होणे गरजेचे आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास दृष्टीदोषावर मात करणे शक्य होते, असे स्पष्ट करत आमदार निकम यांनी संस्थेने भविष्यातही या सेवाकार्याचा विस्तार करून अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नॅब संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी संस्थेच्या आरोग्यविषयक उपक्रमांची आणि भावी योजनांची सविस्तर माहिती दिली. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथील परशुरामनगर परिसरातील इब्राहिम आर्केड येथे हा नवीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या नव्या अद्ययावत तपासणी कक्षामुळे चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना डोळ्यांच्या तपासणीची आधुनिक आणि सुलभ सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.














