ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर ताशेरे; तालुक्याला ‘दुष्काळी तालुका’ म्हणून जाहीर करण्याचा ठराव मंजूर
गुहागर :
जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाणी योजना, स्मार्ट मीटरची सक्ती, निकृष्ट बंधारे, रस्त्यांची दुरवस्था आणि शिक्षण विभागातील विविध समस्यांवरून गुहागर पंचायत समितीची आमसभा मंगळवारी चांगलीच गाजली. गुहागर पाटपन्हाळे येथील मंगल कार्यालयामध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. आमदार जाधव यांनी ही सभा अत्यंत शांततेत हाताळत ठेकेदार आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार प्रहार केला.
सभेत जलजीवन योजनेच्या बोजवाऱ्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी कडक शब्दांत संताप व्यक्त केला. "ज्यांची दोन लाखांची पत नाही, अशांना २०० कोटींची कामे दिली, त्यामुळे जलजीवन योजनेचा बोजवारा उडाला," असे म्हणत त्यांनी ठेकेदार आणि प्रशासनाचे वाभाडे काढले. काताळे येथील अपूर्ण पाणी योजना आणि पेवे राब भोईवाडी येथील जलजीवन योजना अद्याप सुरूच झालेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. काही ठेकेदारांनी ‘मी भूमिपूजन केले’ या कारणावरून मुद्दाम कामे बंद ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या दुष्काळी परिस्थितीत मतदारसंघात टँकरची वेळ येणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच गुहागर तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर व्हावा, असा महत्त्वाचा ठरावही यावेळी घेण्यात आला.
स्मार्ट मीटरच्या सक्तीवरून ग्रामस्थांच्या अनेक तक्रारींचा पाढा वाचत आमदार जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शृंगारतकी उपकेंद्रातील सोनवणे यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असा ठरावही सभेत घेण्यात आला. यापुढे पोलिसांनी स्मार्ट मीटर सक्तीसाठी सहकार्य करू नये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही जबरदस्ती करू नये, अशी तंबी त्यांनी दिली. तसेच कोतळूक शिगवणवाडी येथे १९ लाख रुपये खर्च करून बांधलेला बंधारा अवघ्या एका वर्षातच ढासळल्याप्रकरणी आणि अद्याप दुरुस्ती न केल्याबद्दल संबंधित विभागाला तज्ञांची समज देण्यात आली.

आमसभेला मुख्याधिकारी किंवा त्यांचे अन्य प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. ते कधीही चर्चेला उपस्थित राहत नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास प्रशासनाकडे पाठवण्याचा ठराव मांडण्यात आला. बैठकीत सचिन बाईत यांनी वेळेवर बस न सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. उमेश खैर यांनी तालुक्यात ब्लड बँक किंवा स्टोरेज असावे अशी मागणी केली. पिंपर शाळेवर अतिरिक्त शिक्षकाची मागणी करण्यात आली असता, ज्या शाळांमध्ये मुले आहेत पण शिक्षक नाहीत, तिथे बंद पडलेल्या शाळांचे शिक्षक समायोजित करावेत, असे आदेश आ. जाधव यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. तसेच पगार घेऊन सातारा येथे बदली करून गेलेल्या शिक्षकाला तात्काळ परत बोलवावे किंवा त्याची थेट बदली करावी, असे सुचवले.
एसटी अपघातात कातळे नवानगर येथील महिला गंभीर जखमी होऊन तिच्यावर मुंबईत अधिक उपचार सुरू असल्याची माहिती जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी दिली. त्यावर आमदार जाधव यांनी एसटी विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून उपचाराच्या खर्चाची तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ई-पीक पाहणीबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले.
या बैठकीला सभापती प्रणव पोळेकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, जि.प. सदस्य विक्रांत जाधव, प्रमोद गांधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात आमदार जाधव म्हणाले की, "गुहागर तालुका शांत तालुका आहे, तो शांतच राहू द्या. गेल्या तीन वर्षांत सरकारने आम्हाला पाच पैसे दिले नसले, तरी आपल्या मतदारसंघातील रस्ते सुस्थितीत आहेत आणि कोणतीही शाळा कोणाच्या अंगणात भरत नाही. मात्र, यावर्षीपासून निधी मिळत असल्याने प्रत्येक विभागाने आपल्याकडील कामांची संपूर्ण माहिती ठेवावी."













