राजापूरच्या पाचल शाळेजवळ बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे तैनात

राजापूरच्या पाचल शाळेजवळ बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे तैनात

शालेय परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याने खळबळ; वनविभागाकडून हालचालींवर २४ तास नजर

राजापूर :
राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचल नंबर १ (केंद्र शाळा) आणि लगतच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा थेट वावर आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरवस्तीत आणि शालेय परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुरक्षेबाबत तीव्र चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शालेय परिसर आणि लोकवस्तीमध्ये बिबट्या आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर, लहान मुले, ग्रामस्थ व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत गावकऱ्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली, जमिनीवरील पाऊलखुणा तपासल्या आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी चर्चा करून वस्तुस्थितੀ जाणून घेतली. ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलत सुरक्षात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

बिबट्याचा नेमका वावर, त्याचे येण्या-जाण्याचे मार्ग आणि हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी वन विभागातर्फे परिसरातील मोक्याच्या ठिकाणी नाईट व्हिजन सुविधा असलेले आधुनिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या चित्रफितीच्या (फुटेज) आधारे बिबट्याच्या हालचाली स्पष्ट झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Horizon techno.

दरम्यान, विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय वेळेत तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, शेतात किंवा निर्जन भागात जाताना एकटे जाणे टाळावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.