तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य
राजापूर :
राजापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण साधणे आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत राजापूर पोलिसांनी डोंगर येथे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रत्यक्ष श्रमदान करत वनराई बंधारा बांधला आहे.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार या जलसंधारण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवणे, त्याचा साठा वाढवणे आणि भूजल पातळी उंचावणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पोलिसांनी स्वतः कुदळ-पावडे हाती घेत ग्रामस्थांच्या मदतीने वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. अशा प्रकारच्या पारंपरिक बंधाऱ्यांमुळे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पाण्याची उपलब्धता दीर्घकाळ टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे.
या स्तुत्य उपक्रमाच्या वेळी डोंगर गावच्या सरपंच जुबेदाबी मस्तान, ग्रामसेविका सौ. किनरे, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गुरव, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी (उन्हाळे), संदीप पवार, डोंगरचे पोलीस पाटील दीपक डोंगरकर, डोंगर मुसलमानवाडीचे पोलीस पाटील सचिन कदम, दत्तवाडीचे पोलीस पाटील किरण कामतेकर, चौकेचे पोलीस पाटील तांबे, दोनीवडेच्या पोलीस पाटील सौ. करंगुटकर, विखारे गोठणेचे पोलीस पाटील संजय पावसकर यांच्यासह शामराव कदम, शंकर भुते, संदेश कदम, वसंत देवळेकर आदी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या सामाजिक संवेदनशीलतेचे आणि श्रमदानाचे डोंगर ग्रामस्थांसह संपूर्ण राजापूर तालुक्यातून जोरदार कौतुक केले जात आहे.













