ब्रेकिंग न्यूज : रत्नागिरीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा प्रादेशिक बंदर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ६० हजारांची लाच घेताना खाजगी मध्यस्थासह दोघे ताब्यात!

ब्रेकिंग न्यूज : रत्नागिरीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा प्रादेशिक बंदर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ६० हजारांची लाच घेताना खाजगी मध्यस्थासह दोघे ताब्यात!

परदेशी जहाजाच्या पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी मागितली होती ८० हजारांची लाच; मारुती मंदिर येथील हॉटेलमध्ये रचला सापळा

*रत्नागिरी : *रत्नागिरीतील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा (Maharashtra Maritime Board) वर्ग-१ चा प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७) आणि त्याचा खाजगी मध्यस्थ मिलिंद तुकाराम बनप (वय ५३) यांना ६० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ सापळा रचून ताब्यात घेतले आहे. परदेशी जहाजाच्या चाचणी परवानगी आणि पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी तडजोडीअंती ८० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे रत्नागिरीतील शासकीय आणि बंदर व्यवस्थापन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी आणि तक्रार :

तक्रारदार (वय ३७) यांची शिपिंग एजन्सी असून त्यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या जहाजांना सेवा आणि दुरुस्तीचे काम केले जाते. जयगड पोर्ट येथे आलेल्या एका परदेशी नादुरुस्त जहाजाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, या जहाजाची समुद्रात चाचणी घेण्याची परवानगी देण्यासाठी तसेच पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट (Port Clearance Certificate) देण्यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने सहमती दर्शवल्यानंतर जहाजाला समुद्र चाचणीऐवजी फायर फायटिंग ट्रायलची परवानगी देण्यात आली आणि १० नोव्हेंबर रोजी पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितली गेली. याबाबत तक्रारदाराने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

#concepts\'

पडताळणी आणि मारुती मंदिर येथील हॉटेलमध्ये यशस्वी सापळा :

तक्रारीची दखल घेत एसीबी पथकाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचासमक्ष मोबाईल कॉलद्वारे पडताळणी केली असता, संदीप भुजबळ यांनी ८० हजार रुपयांपैकी ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता खाजगी इसम मिलिंद तुकाराम बनप (रा. कोहिनूर क्रिस्टल, घाणेकर आळी रस्ता, रत्नागिरी; मूळ रा. काळबादेवी भटजीवाडी नं. १) याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिर येथील ‘हॉटेल कार्निवल’ रेस्टॉरंट बारमध्ये तक्रारदाराने पंचासह मिलिंद बनप याची भेट घेतली. यावेळी मिलिंद बनप याने संदीप भुजबळ यांच्या वतीने रोख ६० हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि पैसे मिळाल्याची माहिती भुजबळ यांना फोनवरून कळवली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने सायंकाळी ५.२१ वाजता मिलिंद बनप याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. त्यानंतर आज, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता मुख्य आरोपी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ आणि ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :

ही यशस्वी कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश आनंदराव पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, स.पो.फौ. उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, हेमंत पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, राजेश गावकर आणि पोलीस शिपाई अजिंक्य पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.