साखरपा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
Sangameshwar News मधील एका दुर्दैवी घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवतीवाडी येथे एका ४५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास उघडकीस आले आहे. विलास दत्ताराम गावडे (वय ४५) असे मृत तरुणाचे नाव असून, त्यांनी हे पाऊल नेमके कोणत्या कारणास्तव उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेमुळे चाफवली परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास गावडे हे बुधवारी सकाळी गुरांना चारा-पाणी घालण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी वाड्याच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी वाड्याजवळील एका फणसाच्या झाडाला विलास यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.
Sangameshwar News: रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
कुटुंबीयांनी तातडीने विलास यांना उपचारासाठी देवळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती विलास यांच्या पत्नी विद्या गावडे यांनी साखरपा पोलिसांना दिली. खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रीतसर पंचनामा केला आणि या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विलास यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस तपासानंतरच त्यामागील नेमके कारण समोर येऊ शकेल. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे करत आहेत. मृत विलास गावडे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.













