रत्नागिरीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचे दुःखद निधन

रत्नागिरीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचे दुःखद निधन

शरद पवार यांचे निष्ठावान निकटवर्तीय; सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला, आज सायंकाळी ७ वाजता निघणार अंत्ययात्रा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व अभ्यासू व्यक्तिमत्त्व, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक राजाभाऊ लिमये यांचे आज गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून होते आजारी :

राजाभाऊ लिमये हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ७.०० वाजता रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

Amey jwelrs

कृषी, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ भरीव योगदान :

राजाभाऊ लिमये यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात अनेक महत्त्वाची पदे भूषवून कोकणच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. याशिवाय नारळ विकास बोर्डाचे अध्यक्ष (Coconut Development Board) तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत समर्थपणे आणि निष्ठेने पार पाडल्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.