निधीअभावी ठेवी मोडण्याची वेळ; विविध विभागांमध्ये समन्वय साधून अडचणी दूर करण्याचे आश्वासन
Chiplun Water Scheme अर्थात चिपळूण नगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाचा आमदार भास्कर जाधव यांनी १८ नोव्हेंबर रोजी आढावा घेतला. कोळकेवाडी धरणातून गुरुत्वाकर्षण शक्तीच्या माध्यमातून चिपळूण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेसाठी शासनाकडून अपेक्षित निधी प्राप्त होत नसल्याने नगरपालिकेवर स्वतःच्या ठेवी मोडून पाच कोटी रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी आपल्या कार्यालयात संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.
नगरोत्थान योजनेअंतर्गत २०२४ मध्ये मंजूर झालेल्या या पाणी योजनेची एकूण किंमत १५२ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, आतापर्यंत शासनाकडून केवळ ४५ कोटी रुपयेच प्राप्त झाले असून, त्या निधीच्या प्रमाणातच प्रत्यक्ष काम पूर्ण झाले आहे. सध्या चिपळूण शहराला कोयना धरणातील अवजलातून पाणीपुरवठा केला जात असला, तरी भविष्यातील पाण्याची वाढती गरज आणि संभाव्य संकट लक्षात घेता कोळकेवाडी धरणातून थेट ग्रॅव्हिटीने पाणी आणणे अत्यंत गरजेचे आहे.
Chiplun Water Scheme: विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि लोकवर्गणीचा मुद्दा
पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत स्वतःच्या ठेवींमधून पाच कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय झाल्याचे समजल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी या प्रश्नात लक्ष घातले. त्यांनी कोळकेवाडी धरण व्यवस्थापन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि चिपळूण नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत योजनेचा इतिहास आणि सद्यःस्थिती जाणून घेताना विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोयना सिंचन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि चिपळूण पालिका यांच्यात योग्य समन्वय साधून योजनेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करणे आपल्यासाठी अवघड नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चिपळूण तालुका हा डोंगरी विकास क्षेत्रात समाविष्ट असल्याने या योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणी भरण्याची आवश्यकता नसल्याचेही आमदार जाधव यांनी बैठकीत नमूद केले. तसेच, या योजनेत चिपळूण शहरासोबतच २७ गावांचा समावेश व्हावा, यासाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यातून सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
या आढावा बैठकीला कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता महेश रासणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता योगेश नंजाप्पा, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित कांबळे, चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह नगरसेवक फैसल कास्कर, मिथिलेश ऊर्फ विकी नरळकर, कांचन शिंदे आणि अजय भालेकर आदी उपस्थित होते.













