शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
Ratnagiri News मधील एका दुर्दैवी घटनेत रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय खलाशाचा मृतदेह मिऱ्याबंदर येथील खाडी किनारी आढळल्याची घटना बुधवारी, दिनांक १८ रोजी दुपारी उघडकीस आली. साकीब मेहबूब काझी (वय ४९, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव असून, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साकीब काझी हे कासारवेली येथील एका बोट मालकाकडे कामाला गेले होते आणि त्यांना मद्याचे व्यसन होते. मंगळवारी, दिनांक १७ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते बोटीवरील इतर खलाशांसोबत बोटीवरच होते. मात्र, पहाटे साडेचारच्या सुमारास ते बोटीवर दिसून आले नाहीत.
Ratnagiri News: बोटीवरून बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम
पहाटे साकीब काझी बोटीवर नसल्याचे लक्षात येताच इतर खलाशांनी तातडीने याबाबत बोट मालकाला माहिती दिली. बोट मालकानेही तत्काळ साकीब यांच्या घरी संपर्क साधून ते बोटीवरून निघून गेल्याचे कळवले.

त्यानंतर साकीब काझी यांची शोधाशोध सुरू करण्यात आली असता, बुधवारी दुपारी ते मिऱ्याबंदर येथील खाडी किनारी मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शहर पोलिस अंमलदार पुढील तपास करत आहेत.













