चिपळूण : सावर्डे बाजारपेठेत रस्ता क्रॉसिंगची समस्या

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावर्डे बाजारपेठेत अगोदर रस्ता त्यानंतर फ्लायओव्हर व शेवटी परत रस्ताच मंजूर झाला आणि आता तो पूर्णही झाला आहे. आता मात्र येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करावा लागत आहे. सावर्डे परिसरातील ग्रामस्थांसाठी ही आता कायमस्वरूपीची समस्या तयार झाली आहे.

सावर्डे परिसरात शैक्षणिक संस्था, मेडिकल कॉलेज आणि वालावलकर रुग्णालय आहे. या परिसरात दिवसाला हजारो ग्रामस्थ ये-जा करीत असतात. तीन ते चार हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. तसेच सावर्डेमध्ये बस स्थानकावर उतरून तेथून ग्रामीण भागात जाणाऱ्या ग्रामस्थांची संख्या हो मोठी आहे. रस्त्याचे चौपदरीकरण करताना या ठिकाणी प्रथम उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. सुरुवातीला उड्डाणपूल मंजूर झाला होता. नंतर तो रद्द करून चारपदरी सता करण्यात आला. कोंडमाळा आणि वहाळ फाटा येथे उडाणपूल बांधण्यात आला आहे. कोंडमाळा भागातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

या भागातील महिला डोक्यावर हंडे घेऊन रस्ता क्रॉस करून पाणी आणतात. वहाळ फाटा येथील उड्डाणपूल काही दिवसांपूर्वी खचला होता. ठेकेदाराने आपले निकृष्ट काम लपवण्यासाठी खचलेल्या भागावर डांबरीकरण केले होते. उपाययोजना केल्यानंतर या समस्या सुटणाऱ्या आहेत.

त्यामुळे ग्रामस्थांनी फारशी आक्रमक भूमिका घेतली नाही. मात्र, ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर कोणाचाही अंकुश नाही, हे त्या निमित्ताने समोर आले होते. आता सावर्डे बाजारपेठेतील रस्ता क्रॉसिंगची मोठी समस्या समोर आली आहे. बाजारपेठेत रस्ता क्रॉस करताना दोन मार्गिका ओलांडाव्या लागतात. येथील रस्त्यावर वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. बाजारपेठेत रस्त्यावर उड्डाण पूल असते तर रत्नागिरीकडे जाणारी वाहने वेगाने उड्डाण पुलावरून गेली असती आणि ग्रामस्थांना विनाअडथळा रस्ता क्रॉस करता आला असता.

Shiva optical

वाहने पार्किंगची समस्या गंभीर
सावर्डे बाजारपेठेत खासगी वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. उड्डाणपूल तयार झाला असता तर वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध झाली असती. सध्या दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रवाशांना वाहनांची वाट पाहावी लागते. काही ठिकाणी तर चक्क डिव्हायडरवर अनधिकृत हातगाड्या ठेवण्यात आल्या आहेत.

सावर्डे बाजारपेठेत रविवारी आठवडा बाजार भरतो. वयोवृद्ध नागरिकही येथे खरेदीसाठी येत असतात. रस्ता क्रॉस करताना त्यांनाही त्रास होतो. येथे अजून कोणताही अपघात झाला नाही. भविष्यात उपाययोजना केल्या नाही तर येथे अपघाताचा धोका आहे. – संजय चव्हाण, ग्रामस्थ, येगाव

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 11/Nov/2024