पर्यावरण, करुणा आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश; अयन बॅनर्जी यांच्या ७,००० किमी ‘करुणा पदयात्रे’चा रत्नागिरीत मुक्काम

पर्यावरण, करुणा आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश; अयन बॅनर्जी यांच्या ७,००० किमी 'करुणा पदयात्रे'चा रत्नागिरीत मुक्काम

स्थानिक सामाजिक संस्था, तज्ज्ञ व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी साधला संवाद; सागरी जैवविविधता व जलसंधारणावर भर

रत्नागिरी : पर्यावरणीय शाश्वतता, करुणा आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश देशभरात पोहोचवण्यासाठी तब्बल ७,००० किलोमीटरची देशव्यापी ‘करुणा पदयात्रा’ करणारे युवा पदयात्री अयन बॅनर्जी यांचे नुकतेच रत्नागिरीत आगमन झाले. संपूर्णपणे लोकसहभागावर आधारलेल्या या पदयात्रेदरम्यान त्यांनी रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्था, पर्यावरण तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्थानिक उपक्रमांची माहिती घेतली.

आसामंत बेनेव्होलन्स फाउंडेशनकडून आदरातिथ्य :

१२ ऑक्टोबर रोजी अयन रत्नागिरीच्या दिशेने येत असताना, रात्रीच्या मुक्कामाची कोणतीही पूर्वव्यवस्था नव्हती. याची माहिती मिळताच पश्चिम घाट व कोकणात कार्यरत असलेल्या ‘आसामंत बेनेव्होलन्स फाउंडेशन’चे संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी तत्परतेने पुढाकार घेत त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. ही पदयात्रा लोकसहभाग आणि मानवी संवेदनेच्या बळावर कशी पुढे जात आहे, याचे उत्तम उदाहरण या आदरातिथ्यातून पाहायला मिळाले.

Tata nexon

सागरी परिसंस्था व कासव संवर्धनावर सखोल चर्चा :

१३ ऑक्टोबर रोजी अयन यांनी संस्थेच्या संचालिका डॉ. अमृता विशाल भावे आणि सागरी तज्ज्ञ डॉ. विशाल भावे यांच्याशी संवाद साधला. या वेळी वाढते बांधकाम आणि किनारपट्टीचे काँक्रीटीकरण यामुळे सागरी परिसंस्थेवर, विशेषतः समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या वालुकामय अधिवासावर होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा झाली. "अज्ञानातून निसर्गात चुकीचा हस्तक्षेप करण्यापेक्षा, कोणताही हस्तक्षेप न करणे अधिक हिताचे ठरते," ही मोलाची शिकवण या संवादातून मिळाल्याचे अयन यांनी नमूद केले. या वेळी डॉ. विशाल भावे यांनी स्वतः लिहिलेली खारफुटी (मँग्रोव्हज) व सागरी संवर्धनावरील तीन मराठी पुस्तके अयन यांना भेट दिली. ही पुस्तके महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अयन यांनी केला.

स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची घेतली माहिती :

रत्नागिरी मुक्कामादरम्यान अयन यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या ‘अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या ‘मँगो सिटी फाउंडेशन’चे प्रवीण सर यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीतून तळागाळातील सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांची भेट; सेंद्रिय बियांची अनोखी भेट :

१४ ऑक्टोबर रोजी अयन यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेतली. सूर्यवंशी यांनी या पदयात्रेचा सकारात्मक संदेश प्रादेशिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. कृतज्ञतेचे प्रतीक आणि पर्यावरणपूरक संदेश म्हणून अयन यांनी त्यांना सेंद्रिय भाज्यांच्या ३० बिया भेट दिल्या.

जलसंधारण आणि महिला आरोग्याचे उपक्रम :

त्याच दिवशी अयन यांनी ‘अनुसया महिला स्वयंसेवी संस्थे’ला (AMSS) भेट दिली. संस्थेमार्फत ५ रुपयांत सॅनिटरी नॅपकिन देणाऱ्या व्हेंडिंग मशिन उपक्रमाची आणि पारंपारिक उभ्या बोअरवेलला पर्याय ठरू पाहणाऱ्या नाविन्यपूर्ण ‘हॉरिझॉन्टल बोअरवेल’ (आडवी बोअरवेल) तंत्रज्ञानाची त्यांनी पाहणी केली.

गुजरातमध्ये होणार पदयात्रेची सांगता :

अयन बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावरील ७,००० किलोमीटरची ‘करुणा पदयात्रा’ आता महाराष्ट्रातील पुढील टप्प्यांकडे रवाना होणार असून, या महामोहिमेची अंतिम सांगता गुजरात राज्यात होणार आहे.