रत्नागिरी : परंपरेनुसार, दिनांक 16 ऑक्टोबर 2024 आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पासून ते दिनांक 15 नोव्हेंबर 2024 कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या काळात श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रीं च्या मंदिरात मनोभावे संपन्न होत असलेल्या दिपोत्सवाची सांगता येत्या शुक्रवारी होत आहे.
कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा चालणारा हा दिव्यांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात दररोज साजरा करण्यात आला.
रितीरिवाजानुसार दररोज सायंकाळी श्रीं ची पंचोपचार पूजा करून सात वाजता मंदिरातील सर्व विद्युत पुरवठा व रोषणाई खंडित करून फक्त तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर प्रकाशित करण्यात आले आणि आरती मंत्रपुष्पांजली सेवा सादर करण्यात आली. त्यावेळी दिव्यांचा मनोहारी झगमगाट आणि लखलखाट अनुभवता आला. तद्नंतर प्रसादाचे वाटप करण्यात येऊन त्या त्या दिवसाच्या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.
सदर महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची जय्यत तयारी आणि सुसूत्र नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे मार्फत प्रतिवर्षी करण्यात आले होते. ह्यामध्ये अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली. तरी सर्वांनी या विलोभनीय अश्या दिपोत्सव सांगता सोहळ्याला उपस्थित राहून त्याचा आनंद अनुभवावा, असे आवाहन श्री. घनवटकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 13-11-2024














