आरोग्य, शिक्षणासह पायाभूत सुविधांना प्राधान्य देणार : आ. किरण सामंत

रत्नागिरी : राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघ डोंगराळ भाग असून तेथील जनता अनेक समस्यांचा सामना करीत आहे. याठिकाणी आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांकडे प्राधान्याने आपले लक्ष राहणार आहे. त्यातही आरोग्याच्या व्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यावर अधिकचा भर असणार असल्याचे राजापूरचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सांगितले.

मंगळवारी रत्नागिरी बांगला देशी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आयोजित मोर्चाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. किरण सामंत म्हणाले की राजापूरच्या स्ट्रीट लाईटचे १३ लाखांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे येथील वीजपुरवठा महावितरणने बंद केला होता.

हा विषय आपल्याकडे आल्यानंतर आम्ही महावितरण कंपनीशी चर्चा करून ३ टप्प्यात बिल भरण्याचा निर्णय घेतला म्हणून बंद केलेल्या विद्युत पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. भविष्यात अशा समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आमदार म्हणून आपला प्रयत्न राहणार आहे.

राजापूर मतदारसंघात आरोग्य, शाळांसह अन्य पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेची आरोग्याची होणारी हेळसांड लक्षात घेता आरोग्याच्या सुविधेला प्रथम प्राधान्य असणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाकडे आपण लक्ष देणार आहोत. आजही अनेक वाड्यावस्त्या डोंगरात, खाडी किनारी असून काही भागात रस्तेही पोहोचलेले नाहीत, ग्रामीण भागातील जनतेशी संवाद वाढवत त्यांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहणार असल्याचे आ. किरण सामंत यांनी सांगितले.

Infigo Eyecare

विधी मंडळात शपथ घेण्याची आपली पहिलीच वेळ होती. त्यामुळे आनंद आणि उत्साह वाटला. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आणि बॅकलॉग भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून वेगवेगळ्या पॅकेजची मागणी करणार आहे, असेही आमदार किरण सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 11/Dec/2024