राजापूर : पाचल-जवळेथर रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रारंभ

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल जवळेथर रस्त्यावर मूरखिंड ते तळवडे ताम्हाणे फाटा दरम्यान रस्त्याची दुरुस्ती येत्या आठ दिवसात न झाल्यास सर्वपक्षिय आंदोलन करण्याचा इशारा कोकण विकास आघाडीचे तालुका संघटक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी प्रशासनाला दिला होता. अखेर या इशाऱ्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ता दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ केला. परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने परिसरातील जनतेमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पावसाळा संपला, निवडणुका झाल्या, आचारसंहिता देखील संपली. मात्र प्रशासन, स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते.

अखेर जनतेचा प्रक्षोभ व लोकभावना लक्षात घेऊन कोकण विकास आघाडीचे तालुका संघटक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी येत्या आठ दिवसात या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास सर्वपक्षिय आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

अखेर या आंदोलनाची दखल घेत मूरखिंड ते तळवडे ताम्हाणे फाटादरम्यान रस्ता दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 14/Dec/2024