चिपळूण : तालुक्यातील तनाळी दत्तवाडी येथे दि. १३ रोजी जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. यामध्ये सातजण जखमी झाले असून या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे. यानुसार सात जणांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एकनाथ शंकर झगडे (वय ६५), संकेत एकनाथ झगडे (१९) व दोन महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या एका गटातील, तर दत्ताराम रामचंद्र झगडे (६५), दीपेश दत्ताराम झगडे (३४) व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या दुसऱ्या गटातील नावे आहेत. या बाबत दीपेश दत्ताराम झगडे व एकनाथ शंकर झगडे यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित जागेमध्ये एकनाथ झगडे हे जेसीबीच्या साहाय्याने काम करीत होते. त्यावेळी दीपेश झगडे यांनी त्यांना वडिलोपर्जित जागेत पूर्वकल्पना न देता काम का करीत आहात, असे विचारले. याचा त्यांना राग आला व त्याने दीपेश यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. ही मारहाण सोडविण्यासाठी आलेले साक्षीदार यांनाही मारहाण झाली असून यात त्यांच्यापैकी एकाच्या गळ्यातील पिवळसर धातूचे छोटे व मोठे मंगळसूत्र तोडून नुकसान झाले आहे.
दुसऱ्या गटातील एकनाथ झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडिलोपार्जित जागेत जेसीबीद्वारे साफसफाई करीत असताना दत्ताराम, दीपेश झगडे व एक महिला तेथे आले. साफसफाईचे काम का करीत आहेस असे बोलून शिवीगाळ केली. यात दत्ताराम यांनी एकनाथ यांना दगड मारल्याने ते जखमी झाले तर दीपेश याने साक्षीदार यांना मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 16/Dec/2024














