राजापूर : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या सूचनेनुसार, राजापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे आणि जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल (दि.२३ डिसेंबर) देवीहसोळ (ता. राजापूर) येथील आर्यादुर्गा देवी यात्रेनिमित्त आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथोमोपचार व आरोग्यसेवा तसेच सर्व आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत देवीहसोळ उपकेंद्राचे आरोग्यसेवक मनोज गुरव, अशासेविका सायली नार्वेकर, रेवती भोवड, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नीलेश विचारे, प्रमोद जोशी आदी कर्मचारी उपस्थित होते.आरोग्य प्रदर्शनात जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्री. बेंडकुळे यांनी आरोग्य योजनांबद्दल माहिती दिली. आरोग्य योजनांची माहिती पुस्तिका, आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या उपक्रमांची पुस्तिका तसेच आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या घडीपत्रिका प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आल्या.
याप्रसंगी देवीहसोळचे सरपंच रवींद्र पैकडे, ग्रामदेवता श्री आर्यदुर्गा व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष रमेश विचारे, सेक्रेटरी अविनाश भोवड, खजिनदार दिनकर विचारे आदी सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी नीलेश विचारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 24-12-2024














