रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नव्या वास्तूचे आज भूमिपूजन

रत्नागिरी : महाराष्ट्रातील १९७ वर्षांचे हे सर्वांत जुने वाचनालय असून, द्विशताब्दीकडे वाटचाल करत आहे. अशा वेळी नवीन प्रशस्त वास्तूची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. या नव्या वास्तूचे भूमिपूजन बुधवारी (ता. २५) सकाळी १०.३० वा. होणार आहे.

यासाठी आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या जागेचे लीज व्हावे म्हणून २४ वर्ष संघर्ष केल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये ३० वर्षांसाठी शासनाने जागा लीजवर दिली आणि नवीन प्रशस्त वास्तू नवीन इमारत ११ हजार ५०० चौ. फुटांची दुमजली बांधकामाची नियोजित आहे. तळमजल्यावर पुस्तक मांडणी आणि ग्रंथालय विभाग, पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह, दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका, मुक्त वाचन विभाग, सांस्कृतिक कक्ष असे विभाग प्रस्तावित आहेत. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी साडेतीन कोटींचे अंदाजपत्रक आहे.

वास्तूचा मार्ग मोकळा झाला. पालिकेने आराखड्याला मंजुरी दिली आणि जुनी इमारत पाडण्याचे त्यासाठी सर्व सामान प्रामुख्याने अमूल्य अशी १ लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक होते, ते आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. वाचनालयाचा रोजचा काउंटर आणि त्या ठिकाणी ही आवश्यक ग्रंथ राहतील, अशी मध्यवर्ती; पण कमी खर्चाची जागा शेरेनाका येथे मिळाली असून, तिथे वाचनालयाचे नियमित कामकाज सुरू आहे.

पुढील सहा महिन्यांत दुमजली इमारत उभी करून दिवाळीपर्यंत तळमजल्यावरील वाचन विभागअंतर्गत सजावटीसह सज्ज करण्याचा आणि जानेवारी २०२७ पर्यंत म्हणजे द्विशताब्दी महोत्सव प्रारंभ होतानाच पूर्ण वाचनालय इमारत वाचक आणि संस्कृतीप्रेमीसाठी लोकार्पण करू. आजपर्यंत एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, अजून अडीच कोटींचा निधी मिळवण्याचे आव्हान आहे. रत्नागिरीकर, वाचक आणि कंपन्यांनी आपला सीएसआर फंड देऊन या ऐतिहासिक वाचनालयाला मदत करावी, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 25/Dec/2024