गुहागर : पडवे येथे ट्रान्सपॉन्डर उपकरणाबाबत जनजागृती

गुहागर : रिलायन्स फाऊंडेशन, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्यावतीने ट्रान्सपॉन्डर उपकरणाबाबत तालुक्यातील पडवे येथे जनजागृती करण्यात आली. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या सुरक्षिततेसाठी मासेमारांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसाविण्यास मस्त्यव्यवसाय विभाग, रत्नागिरी यांनी सुरवात केलेली आहे.

यावेळी चव्हाण (परवाना अधिकारी, गुहागर) यांनी मासेमारांना ट्रान्सपॉन्डर उपकरणांची इत्यंभूत माहिती मासेमारांना दिली व आपत्कालीन परिस्थितीत जसे की आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास नौकांवर खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश कसा पाठवता जातो व त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो. त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपव्दारे नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त होतो.

ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविणे हे नौका मालक तसेच मासेमारी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बंदर निहाय नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याचे काम आहे. हे उपकरण बसविण्यासाठी मच्छीमार संस्था व नौका धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आनंद पालव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांनी केले आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने राजेश कांबळे यांनी, रिलायन्स फाऊंडेशन मासेमारांसाठी दररोज सागरी हवामानाची माहिती, वादळाची पूर सूचना, मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, ट्रान्सपॉन्डर उपकरणांची जनजागृतीपर माहिती इत्यादी माहिती ध्वनी संदेश व व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मच्छीमारांपर्यंत तत्काळ पोहोचविण्याचे काम करीत आहे. तसेच मासेमारांना सागरी सुरक्षा, मासेमारीसाठी उपयुक्त उपकरणांची प्रशिक्षण देत आहे. यावेळी सुरक्षा पर्यवेक्षक शिंदे, राजन शिंदे, अंकेश चिंगडे, सुरक्षा रक्षक परिमल तोडणकर, रिलायन्स फाऊंडेशनचे गौरव जाधव, पडवे सहकारी मच्छीमार संस्थेचे चेअरमन मुदस्सर खले आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 25/Dec/2024