किनारपट्टीच्या सुरक्षेला प्राधान्य : मंत्री नितेश राणे

सावंतवाडी : हिंदू धर्मासाठी घेतलेल्या केसेसचा मला अभिमान असून हिंदू राष्ट्राला विकसित करण्यासह राष्ट्र सुरक्षित ठेवणेही आपली जबाबदारी आहे. देशामध्ये घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी, रोहिंगे मुसलमान आपल्या किनारपट्टीवर मस्ती करू पाहत आहेत. या खात्याचा मंत्री म्हणून त्यांची मस्ती खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला.

विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे. या संघटनेने देशाला नेतृत्व करणारे नेते दिले. त्यामुळे देशाच्या अन् हिंदूंच्या विरोधात असणाऱ्यांच्या आडवे जाणे गरजेचे आहे. तो कडवटपणा आपल्यात असलाच पाहिजे. तरच, देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोंकण प्रांत अधिवेशनाला सावंतवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी येथे प्रारंभ झाला. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रा. डॉ. मनीष जोशी यांच्या हस्ते व मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ना. नितेश राणे बोलत होते.

स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल रजोरीअ, सावंतवाडी शहराध्यक्ष डॉ. साईनाथ सितावार, शहरमंत्री स्नेहा धोटे, देवेन सामंत, सावंतवाडी संस्थानचे. युवराज लखमराजे भोसले, भोसले नॉलेज सिटीचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, सुधीर आडीवरेकर, अन्नपूर्णा कोरगावकर, उदय नाईक, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, ऐश्वर्या कोरगावकर, डॉ. प्रसाद देवधर, अॅड. सुषमा खानोलकर, डॉ. राजशेखर कार्लेकर, प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर आदी उपस्थित होते.

अधिवेशनासाठी पालघर ते गोवा या कोकण प्रांतातील एक हजार विद्यार्थी उपस्थित आहेत. ना. राणे म्हणाले, विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे. या संघटनेने देशाला नेतृत्व करणारे नेते दिले आहेत. तो इतिहास जपला पाहिजे. माझ्यावर हिंदूत्वासाठी कार्य करताना ३८ केसेस झाल्या. धर्मासाठी घेतलेल्या केसेसचा मला अभिमान आहे. देशाच्या अन् हिंदूंच्या विरोधात असणाऱ्यांच्या आडवे जाण गरजेचे आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आक्रमणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्यात तो कडवटपणा असला पाहिजे. तरच आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. या अधिवेशनाला पुढे घेऊन जाताना हिंदू राष्ट्राला तुमची मदत होईल अशी भूमिका घेऊन जा, आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांद लावून उभे आहोत, अशी ग्वाही देत अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिषदेचे कौतुक केले.

प्रा. डॉ. मनिष जोशी म्हणाले, विकसित कोकणासह सुरक्षित कोकण हे आव्हान देखील आपल्या पुढे आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच मोठा संघर्ष केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून माझ्यासारख्याला कोकणची ओळख झाली. विकसित देशात विद्यार्थी परिषदेचे योगदान फार मोठे आहे. नव्या शैक्षणिक धोरणासाठी या परिषदेने मेहनत घेतली आहे. युजीसीच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हा, २०४७ ला भारत सुरक्षित, विकसित असला पाहिजे. यासह सर्वांगीणदृष्ट्या विकासित राष्ट्र असावं यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा धोटे, आभार साईनाथ सितावार यांनी मानले.

भगवे कोकणही म्हणा…!
मंत्री नितेश राणे म्हणाले, केवळ ‘समृद्ध कोकण, विकसित कोकण’ ही अधिवेशनाची टॅगलाईन असली तरी याला ‘भगवे कोकण’ असं पुढे जोडा, असे मी म्हणेन. हिंदुराष्ट्रात आपण काम करतो. राष्ट्र प्रथम आपण मानतो. या राष्ट्राला विकसित करण्यासह सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. आपली ती जबाबदारी आहे हे स्वीकारून वागले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर काही जण हे राष्ट्र इस्लाम राष्ट्र करण्याचा डाव आखत आहेत. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही आहे, असा इशारा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 28/Dec/2024