खेड : रसाळगडावरील जनसुविधा केंद्राचे बांधकाम थांबले

खेड : तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड हे शिवप्रेमी व पर्यटक यांचे पसंतीचे ठिकाण आहे. या ठिकाणी सातत्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र येथे अद्याप जनसुविधा केंद्राची सोय नसल्याने गडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. किल्ले रसाळगडावर अद्ययावत जनसुविधा केंद्राची सोय व्हावी, यासाठी अनेक शिवप्रेमी संस्था शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. घेरारसाळगड गावातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्र होण्यासाठी शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे सातत्याने मागील अनेक वर्षे पाठपुरावा केला आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे हे जनसुविधा केंद्र बांधण्याचे काम सुरू देखील झाले; मात्र शासनाच्या दोन विभागांत समवन्य नसल्याने हे काम सध्या थांबले आहे.

शिवभक्त रामचंद्र आखाडे व अनेक शिवप्रेमी संघटनांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने एकूण १० राज्य संरक्षित स्मारकावर जनसुविधा केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार किल्ले रसाळगड येथील जनसुविधा केंद्राच्या बांधकामासाठी १ कोटी ९ लाख १७ हजार ४०३ रुपये मंजूर असून सदर जनसुविधा केंद्राचे बांधकाम सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. ज्या ठिकाणी जनसुविधा केंद्राची निर्मिती करण्याचे नियोजन होते त्या ठिकाणी बांधकामाला कोणाची हरकत व तक्रार असल्यास कळविण्यासंबंधी बांधकाम सुरू करण्यापूर्वी नोटीस बोर्ड लावण्यात आला होता. नोटीस बोर्ड लावल्यानंतर १५ दिवस वाट पाहून कोणाचीही तक्रार न आल्यामुळे संबंधित ठेकेदार यांनी जनसुविधा केंद्राचे बांधकाम सुरू केले आहे.

किल्ले रसाळगड हे राज्य संरक्षित स्मारक असून शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. येथे कोणतेही काम करताना पुरातत्त्व विभागाची परवानगी घेतली जाते व आजपर्यंत किल्ले रसाळगडावर जी बांधकामे झाली आहेत, ती सर्व पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली झाली आहेत. व सुरू असलेले जनसुविधा केंद्राचे बांधकामसुद्धा पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली
किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राचे बांधकाम रितसर सुरू असताना अचानक वनविभागाने बांधकामावर हरकत घेऊन जनसुविधा केंद्राचे बांधकाम बंद केले आहे. संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायजरवर गुन्हा दाखल केला आहे. किल्ले रसाळगड संरक्षित स्मारक हे वनविभागाच्या भूमापन क्रमांक १०९ सातबारा उताऱ्यामध्ये येत आहे. किल्ले रसाळगड येथे कोणतेही काम करताना वनविभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे वनविभाग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभाग व पुरातत्त्व विभाग दोन्ही महाराष्ट्र शासनाचे विभाग आहेत. परंतू या दोन्ही विभागांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने जनसुविधा केंद्राचे बांधकाम सध्या बंद आहे.

आंदोलनाचा इशारा
ऐतिहासिक पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राचे बांधकाम वनविभागाने बंद पाडल्यामुळे खेड तालुक्यातील सर्व शिवप्रेमी जनता संतप्त झाली आहे. लवकरच वनविभाग व पुरातत्त्व विभाग यांनी सामंजस्याने मार्ग न काढल्यास महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमी जनता मिळून विभागीय वनाधिकारी चिपळूण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करू, असा इशारा घेरारसाळगड गावातील शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 28/Dec/2024