गणपतीपुळेत बेमुदत उपोषण करणाऱ्या ‘त्या’ व्यावसायिकाची प्रकृती खालावली

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील शरद मयेकर यांचा गणपतीपुळे येथे नारळ पाणी तसेच भेळ पाणीपुरीचा व्यवसाय होता. मात्र, या व्यवसायाला गणपतीपुळे ग्रामपंचायतीने परवानगी नाकारल्याने त्यांनी शुक्रवार, २७ डिसेंबरपासून पत्नीसह आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य प्रशासकीय यंत्रणा यांना लेखी निवेदन दिले असून, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

प्रकृती खालावलेल्या मयेकर यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. श्री. मयेकर यांनी गणपतीपुळे समुद्रकिनारी आपला व्यवसाय करीत असताना सुमारे ३९ जणांना वाचविण्याची कामगिरीही केली आहे. या कामगिरीमुळे त्यांना पोलिस यंत्रणेकडून आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाऱ्या अशा व्यावसायिकावर उपोषण करण्याची वेळ आल्यानंतर आता आता संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून त्याला कशा प्रकारे न्याय दिला जातो, याकडे याकडे लक्ष लागून राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 30/Dec/2024