संगमेश्वर : धामणी येथील मोटारीच्या अपघातात सातजण जखमी

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे दोन मोटारीच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून, अपघाताची बातमी समजताच संगमेश्वर पोलिस दाखल झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिका व खासगी वाहनाने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला, मोटारचालक अतुल आनंद किशोर नंदा (वय ३४, मूळ रा. फरिदाबाद) हा गोवा ते मुंबईकडे जात होता. दुसऱ्या मोटारीचा चालक ओंकार शंकर घाडगे (२३, रा. पाटण-आंबळे, हा) साताऱ्याहून गणपतीपुळेकडे जात होता. सुसाट वेगात येणाऱ्या दोन्ही मोटारींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, गोव्याच्या दिशेने धावणारी मोटार मुंबईच्या दिशेने फिरली. एका मोटारीची एअर बंग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून चालक अतुल नंदा, लिंडा मेलवान डिक्रॉस्टा (वय ५८, अंधेरी), शॉन मेलवीन डिकॉस्टा (२४, रा. अंधेरी यांना मार लागला असून, लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला आणि पायालाही दुखापत झाली आहे. दुसऱ्या मोटारीतील ओंकार घाडगे (वय २३), अभिजित अशोक खरात (२४, रा. सातारा), प्रदीप लक्ष्मण माने (२०, रा. सोलापूर) यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिव्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे.

अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल यांनी अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली, पुढील तपास उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 30/Dec/2024